तांदुळवाडी किल्ल्यावरील पाण्याची कुंडे (Water Tanks / Reservoirs)

पाण्याच्या कुंडांचे तत्कालीन महत्व

गिरिदुर्ग किंवा डोंगरांवरील किल्ले का बांधले गेले असावेत? तत्कालीन अरबांच्या किंवा मुघल सैन्यात मुख्यत: घोड्यांचा व उंटांचा समावेश असे. हे प्राणी सपाट जमीनीवर वेगवान हालचालीसाठी उपयुक्त असत. त्यामुळे त्यांच्याविरूध्द जमीनीवरील लढाईत आपला ठिकाव लागणे कठीण आहे, हे लक्षात आल्यानंतर गिरिदुर्ग बांधले गेले. गिरिदुर्गामुळे विस्तिर्ण प्रदेशावर एक नजर फिरविली तरी शत्रुच्या हालचाली दिसत.

परंतु गिरिदुर्गावर पाण्याचे झरे फारच कमी अथवा बिलकुल नसत. म्हणूनच गिरिदुर्गावर पिण्याच्या व रोजच्या इतर वापरासाठी पाण्याची कुंडे दगडात खोदलेली दिसतात. जमेल त्या ठिकाणी पाण्याची कुडे खोदून पावसाळ्यापर्यंत पाण्याची गरज भागेल अशी व्यवस्था त्याकाळी केली गेली होती.

सफाळे घाटातून येण्याच्या मार्गावरील कुंडे

गिरीदुर्ग असल्याने या किल्ल्यावर अनेक पाण्याची कुंडे आहेत. तांदुळवाडी किल्ल्याच्या सर्व दिशांना हि कुंडे आहेत, हे विशेष. सफाळे घाटमाथ्यावरून तुम्ही चढाई केली असेल तर तुम्हाला वाटेत काही कुंडे आढळतील. मुळ किल्ल्यापासून हि कुंडे खुपच दूर आहेत. हि कुंडे बहुधा तत्कालीन घोडेस्वारांसाठी खोदली गेली असावीत. म्हणजेच प्रवास करून आलेल्या घोडेस्वार व घोडे यांना या कुंडाचा आधार होता.

चढाई करताना आग्नेय दिशेस असलेली कुंडे
Water Tanks during ascent

तुम्ही जर ‘एक पाय वाट’ हि कठीण वाट चढाईसाठी वापरली असेल तर किल्ला जवळपास 90 टक्के चढून पूर्ण झाल्यावर भर रस्त्त्यातच पहिले कुंडे दिसते. हे कुंड मातीने पूर्ण भरले आहे. म्हणजेच या कुंडात पाणी नसते. या कुंडाच्या बाजुंवर गोलाकार खड्डे दिसतात. तसे ते वरील कुंडांमधेही दिसतात. पाण्याच्या कुंडामधील पाण्याचे बाष्पीभवन होऊ नये म्हणून कदाचित या खड्ड्यांमधे खांब रोवून त्यावर कापड वगैरे लावत असावेत. जाणकारांनी योग्य ती माहिती प्रतिक्रियेद्वारे द्यावी, हि विनंती. या कुंडाच्या भिंतीवरून जावे लागते, म्हणून तुम्ही योग्य ती सावधानता बाळगा. 

सावधान!
चढाई करताना या कुंडांच्या भिंतीवरूनच जावे लगते. भिंती अरूंद (narrow) आहेत. तसेच त्या तिरप्या (slanted) आहेत. त्यामुळे घाई केली तर तुम्ही पडू शकता. पावसाळ्यात भिंतींवर मळी साचते, तेव्हा या ठिकाणी तुम्ही तुमची काळजी घ्या, धावपळ करू नका.
किल्ल्यावरील 7 कुंडे
Water Tanks

चढाई पुर्ण केल्यावर तुम्हाला हि सात कुंडे दिसतील. किल्ल्यावरील इतर ठिकाणी जाण्यासाठी 7 कुंडे हा starting point किंवा base म्हणून या वेबसाईटमधे वापरला आहे. म्हणजेच किल्ल्यावर तुम्ही हरवला असाल तर या 7 कुंडांपाशी या. त्यानंतर पुढील नियोजन या वेबसाईटचा वापर करून करा.

या कुंडांमधे बाराही महिने पाणी असते. नवखे पर्यटक / ट्रेकर्स या कुंडांमधील पाणी पिण्यासाठी वापरतात. emergency असेल तरच या कुंडांमधील पाणी पिण्यासाठी वापरा. कारण हे पाणी जंगलातील पशू व प्राणी देखील पितात. तसेच काही पर्यटक / ट्रेकर्स यात पोहतात किंवा पाय बुडवून बसतात. Ignorance is bliss म्हणतात ते खरेच आहे. कारण आम्ही लहानपणी या कुंडांपैकी विशिष्ट कुंडामधील पाणी गाळून प्यायचो. अर्थात तो काळ खुपच वेगळा होता. त्या काळी फक्त स्थानिकच या किल्ल्यावर यायचे. आता हजारो पर्यटक / ट्रेकर्स येतात. ते कसे वागतील याचा काहीच नेम नसतो. म्हणून या कुंडांमधील पाणी आम्ही पीत नाही.

सावधान!
या 7 कुंडांपैकी काही कुंडे खोल आहेत. साधारणत: 8-10 फुट. तसेच यात गाळ आहे. काही पर्यटक / ट्रेकर्स कुंडामधे अणकुचीदार वस्तू फेकतात. त्यामुळे या कुंडांमधे उतरल्यास तुम्हाला इजा होऊ शकते. तुम्ही यात उतरू नका.

हातपाय, तोंड धुण्यासाठी यातील पाणी तुम्ही वापरू शकता. भर उन्हाळ्यातही या कुंडांमधील पाणी अंगावर शहारे येतील इतके थंडगार (chilled) असते. तुम्हाला चढाईचा ताण, थकवा एका सेकंदात घालवायचा असल्यास या कुंडांमधील पाण्याने तोंड धुवा. फ्रेशनेस म्हणजे काय, ते नेमके समजेल. पण पाणी तोंडात घेणे टाळा.

 

ईशान्य दिशेकडील दोन कुंडे

7 कुंडांच्या वरच्या बाजुस एक पायवाट जाते. या पायवाटेने किल्ल्यावरील अनेक ठिकाणी जाता येते. बालेकिल्ल्याकडे जाणारा मार्ग देखील या पायवाटेने गेल्यावर येतो. याच मार्गावर हि दोन कुंडे आहेत. या कुंडांमधेही बाराही महिने पाणी असते. पण हे पाणी आम्ही कधीच प्यायलो नाही. तसेच यातील पाण्याने आम्ही कधीच हात-पाय-तोंड धुतले नाही. या कुंडांची खोली साधारणत: 7 कुंडांइतकीच आहे. योगायोग म्हणा अथवा अन्य काही. पण या कुंडाजवळ मी नेहमी सापांचे वास्तव्य पाहिले आहे. या बाजुला खुपच कमी वर्दळ असते म्हणून कदाचित असे असावे.

पुर्वेकडील टोपी कुंडे

7 कुंडांच्या वरच्या बाजुस एक पायवाट जाते. ती पायवाट पकडा. थोडा चढ चढून गेल्यावर उजव्या हातास तलाव दिसेल. या तलावाच्या डाव्या हाताने गेल्यास ईशान्य दिशेकडील दोन कुंडे, बालेकिल्ला तसेच तारूखिंड दिसते. उजव्या बाजुने, वरच्या दिशेस गेल्यास पठार लागेल. पठाराच्या उजव्या बाजुस गेल्यावर, उजव्या बाजुस थोडे खाली उतरल्यावर हि कुंडे तुम्हाला दिसतील. या कुंडांमधे पाणी फक्त पावसाळ्यातच असते. मुळात या कुंडांचे खोदकाम पुर्ण झालेच नाही. या कुंडांच्या वरचा दगडी भाग टोपीसारखा शाबुत ठेवल्याने जर तुम्हाला पावसापासून वाचायचे असेल तर या कुंडांचा आधार घ्यावा लागतो. कारण पुर्ण किल्ल्यावर पावसापासून संरक्षण देऊ शकेल अशी जागा नाही.

तुम्ही जर पावसाळ्यात ट्रेक करत असाल तर महत्वाचे!
ऐन पावसात तांदुळवाडी किल्ल्यावर ढग उतरतात. एका फुटापर्यंतची वस्तुसुद्धा तुम्हाला दिसणार नाही. अशावेळी तुम्ही किल्ल्यावर असाल तर येथील वातावरण खुपच थंडगार होते. थंडीने तुमचे दातावर दात वाजायला लागतात. अशा वेळी टोपी कुंडे तात्पुरता आसरा म्हणून तुम्ही वापरू शकता. पण माझा सल्ला आहे की अशा परिस्थितीत तुम्ही हा किल्ला तात्काळ सोडा.

अधिक माहिती खाली देत आहेच परंतु हि वेबसाईट तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रांना या वेबसाईटविषयी नक्की सांगा. मुळातच मायबोली मराठीमधे कोणी वेबसाईट बनवत नाही. आम्ही मेहनत घेऊन हि वेबसाईट तुमच्यासाठी मराठीत बनविली आहे तरी हि वेबसाईट तुमच्या मित्रांना शेअर करा. तुमच्या फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम इ. अकाउंट्सवर या वेबसाईटविषयी माहिती नक्की द्या, धन्यवाद!

राजा-राणी कुंडे व त्यावरील कुंडे

टोपी कुंडावरून हि कुंडे सहज दिसतात. या किल्ल्याचे राजा-राणी या कुंडामधे आंघोळीला जात, अशी परिसरात या कुंडांविषयी दंतकथा आहे. वास्तवात या कुंडावर जायचा मार्ग अतिशय कठीण आहे. पायाच्या फक्त अंगठ्यांचा वापर या कुंडाकडे जाण्यायेण्यासाठी करता येतो. एवढ्या कठीण ठिकाणी तत्कालीन राजा-राणी आंघोळीस जात असावेत, असे वाटत नाही. मुळात बालेकिल्ल्याजवळ एक बांधीव कुंड आहे. त्यातील पाणी राजा-राणींसाठी वापरले जात असणार. असो. त्याबद्दल माहिती पुढे मिळेलच.

सावधान!
मी माझ्या पुर्ण आयुष्यात फक्त दोनदा या कुंडावर जाऊन आलो आहे. कारण वर पाहिले की निखळलेले टोकदार दगड व खाली पाहिले की लहान पण अणकुचीदार दगडाने भरलेली दरी आहे. दरीत पडल्यास मरणार नक्कीच नाही पण गंभीर दुखापत होऊ शकते. म्हणून या कुंडावर अनुभवी व न घाबरणाऱ्या ट्रेकरनेच जावे. म्हणजेच rock climbing करणाऱ्या ट्रेकर्संनी जाण्यास हरकत नाही.

राजा-राणी कुंडांच्या वर अजुन दोन अजुन दोन कुंडे आहेत. त्याकडे जा-ये करावयाचा मार्ग अजूनच कठीण आहे. मी या किल्ल्यावर 100 वेळा तरी येऊन गेलो आहे. पण पुर्ण आयुष्यात फक्त एकदाच या कुंडावर माझ्या मित्रांना जाताना पाहिले आहे. तुम्हाला विनंती आहे की स्वत:च्या जिवाची पर्वा करा व इथे जाऊ नका.

पश्चिमेकडील सफाळ्याच्या बाजुला असलेली कुंडे

7 कुंडाच्या बरोबर खाली पश्चिमेस हि कुंडे आहेत. या कुंडांकडे जायचा मार्ग खुपच धोकादायक आहे. पायवाटेत सुरूवातीला लहान खडी आहे. ज्यावरून तुमचा पाय घसरून तुम्ही खोल दरीत पडू शकता.  कुंडे अतीधोकादायक ठिकाणी आहेत, हे तुम्हाला कळण्यासाठी काही फोटो आहेत. या कुंडावर येणे येरागबाळ्याचे काम नोहे (नाही). याचा मार्ग अतिधोकादायक आहे. याच वैशिष्टामुळे येथे सहसा कोणी जात नाही. त्यामुळे आम्ही येथील पाणी प्यायला वापरायचो.

पुर्वी हि कुंडे स्वच्छ होती. यात गाळ नव्हता. आता खुप गाळ साचला आहे. त्यामुळे पाणी दुषीत झाले आहे. परंतु आजकाल पुर्ण नियोजन करून जात असल्याने किल्ल्यावरी कोणत्याही कुंडांमधील किंवा तलावातील पाणी आम्ही पीत नाही. मात्र रात्री किल्ल्यावर निवास करावयाचा असल्यास येथील पाणी गाळून व उकळून प्यायले जाते.

अतिधोकादायक मार्ग!
सुरूवातीला एक पायवाट आहे. पाय सरकला तर थेट दरीत कोसळणार. नवख्यांनी अनुभवी ट्रेकर्सशिवाय या कुंडाकडे जाऊ नये.
इतर कुंडे

फोटोमधे दिसत असलेली कुंडे किल्ल्यावर इतरत्र आढळतात. नेमके स्थान मलाही सांगता येणार नाही, कारण हा लेख लिहीतेवेळी माझ्याकडी जुन्या फोटोंमधील हि कुंडे (कुंडांचे फोटो) दिसले. या वेबसाईटला तुम्ही पुन्हा भेट द्या. मी हि कुंडे कुठे आहेत त्याबद्दल तुम्हाला माहिती नक्कीच देईन.